सोमवार, 5 जुलाई 2010

पार्श्वभूमी :
People's Institute of Rural Development (ग्रामीण विकास लोकसंस्था) आणि हैद्राबाद येथील National Council for Rural Institute – NCRI यांच्या संयुक्त सहकार्याने २८ जाने. २०१० रोजी, स्वंसेवी संस्था, शेतकरी आणि महिला बचत गट यांच्यासाठी " पाणी, माती आणि ऊर्जा संवर्धन बाबतचे सुक्ष्म नियोजन " या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पाणी, माती आणि उर्जा संवर्धन बाबतची आजची गरज, याबाबतचे तंत्र, कार्यक्रमाची प्रत्यक्ष अमलबजावणी, त्यातील लोकसहभाग आणि स्वंसेवी संस्थांची भूमिका यानुषंगाने जाणकार तज्ञानी मांडणी केली आणि उपस्थित स्वंसेवी संस्थांच्या प्रतिनिधिनीं भविष्याती वाटचाली विषयी चर्चा केली. पाणी, माती आणि ऊर्जा संवर्धन ही समग्र समाजाची गरज आहे, हे लक्षात घेवून या मुलभूत विषयावर काम करण्यासाठी या परिसरातील स्वंयसेवी संस्थानी संगठीत प्रयत्न करावा, यानुषंगाने ग्रामीण विकास लोक संस्थे (PIRD) च्या मार्गदर्शनाली स्वंयसेवी संस्थांचे नेटवर्क उभे करण्यात यावे असा संकल्प याप्रसंगी उपस्थित स्वंसेवी संस्था प्रतिनिधिंच्या वतीने करण्यात आला.

बालाघाट विकास समितीची स्थापना :
दि. २८ जानेवारी रोजी पार पडलेल्या " पाणी, माती आणि ऊर्जा संवर्धन बाबतचे सुक्ष्म नियोजन " कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी केलेल्या संकल्पानुसार, वरील विषयाच्या अनुषंगाने स्वंयसेवी संस्थांचे नेटवर्क निर्माण करणे आणि भविष्यातील वाटचाल निश्चित करणेचे दॄष्टीने " ग्रामीण विकास लोक संस्थे (PIRD) च्या पुढाकारांने दि. २१ एप्रील २०१० रोजी स्वंयसेवी संस्थांची बैठक बोलावण्यात आली. कार्यशाळेस उपस्थित असलेल्या संस्थापैकी एकून १३ संस्थाचे प्रतिनिधि या बैठकीस उपस्थित होते. जि. प.लातूर च्या महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापति श्रीमती कुशावर्ता बेळ्ळे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीत केवळ " पाणी, माती आणि ऊर्जा संवर्धन " या विषयाच्या अनुषंगाने काम करणे हाच या नेटवर्कचा मुख्य उद्देश असेल असे या बैठकीत सर्वसंमतीने निश्चित करण्यात आले.

वरील उल्लेखित विषयाच्या अनुषंगाने नेटवर्क मध्ये सहभागी असलेल्या स्वंयसेवी संस्थांनी १) लोकांच्या सहभागाने गावस्तरावर प्रकल्प अमलबजावणी करावी , याशिवाय २) या विषयाच्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून चालु असलेल्या कार्यक्रमात/प्रकल्पात माहिती संकलन- वितरण, जनजागरण , प्रशिक्षण,पाठपुरावा करणे आणि मुल्यमापण करणे या कामी माध्यम आणि समन्वयक स्वरुपात नेटवर्क सदस्यांनी काम करून सबंधित प्रकल्प कार्यक्षमपणे राबविण्यात मदत करावी , अशी आपली मुख्य कार्यपध्दती असेल असा निर्णय नेटवर्कच्या वतीने घेण्यात आला.

याप्रसंगी घेण्यात आलेले अन्य निर्णय असे - १) या नेटवर्क मध्ये सहभागी झालेले सर्व सदस्य ’ बालाघाट परिसरातील ’ असलेमुळे आणि बालाघाट डोंगराच्या रांगेतील परिसरातील गावांचा विकास अशी नेटवर्कची दॄष्टी असलेमुळे या नेटवर्कचे नाव बालाघाट विकास समिती असे असेल असा निर्णय घेण्यात आला.२) सध्या या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या स्वंयसेवी संस्था प्रामुख्याने लातूर, नांदेड, परभणी आणि बीड जिल्यातील आहेत. भविष्यात या नेटवर्कमध्ये ’ बालाघाट ’ परिसरातील स्वंयसेवी संस्थांना सहभागी करुन घ्यावे असा पण निर्णय यापसंगी घेण्यात आला. ३) नेटवर्क मध्ये सहभागी असलेल्या स्वंयसेवी संस्थांची ’ पाणी , माती आणि उर्जा संवर्धन ’ याबाबत क्षमता वाढावी या करिता संस्था प्रतिनिधि आणि कार्यकर्त्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावे तसेच, ४) अभ्यास सहल पण आयोजित करण्यात यावी. ५) बालाघाट विकास समितीच्या भविष्यातील वाटचालीत ग्रामीण विकास लोक (PIRD) संस्थेने ’ मातॄ संस्था ’ म्हणून भुमिका पार पाडावी, तसेच ६) मच्छींद्र गोजमे यांनी नेटवर्कचे कार्यवाह आणि गंगाधर गुणाले यांनी सहकार्यवाह म्हणून जबाबदारी स्वीकारावी असा निर्णय नेटवर्कच्या वतीने घेण्यात आला.

बालाघाट विकास समितीची वाटचाल

१.नेटवर्क सदस्य संख्येत वाढ:
बालाघाट विकास समितिच्या दि. ६ जून २०१० रोजी झालेल्या बैठकीत नवीन ८ स्वंयसेवी संस्थांनी सदस्यत्व स्वीकारले , यामुळे नेटवर्क मधील सदस्य संख्या २१ वर पोंहचली असून , यात पुढील २/३ महिण्या आनखी भर पडणार आहे, याची आम्हास खात्री आहे.

२.’ बालाघाट ’ सदस्यांची अभ्यास सहल
पाणी , माती आणि उर्जा संवर्धन बाबत महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ आणि प्रेरणादायी असे कार्य अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाने करून दाखविले आहे, हे कार्य नेटवर्कच्या सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणे आणि सबंधित लोकांशी चर्चा करून अनुभव घेणे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरु शकते, हे लक्षात घेवून हिवरे बाजार पाणलोट कार्यक्रमास भेट देण्याचा निर्णय घेवुन दि. १३ व १४ जून २०१० या कालावधित हिवरे बाजार, म. फुले कॄषी विद्यापीठ, राहुरी आणि फा. बाकर यांच्या प्रेरणेतून उभे राहीलेले दरेवाडी या ठिकाणांस भेट देण्यासाठी ’ अभ्यास सहलीचे ’ आयोजन करण्यात आले.

अभ्यास सहली अंतर्गत पहिल्या दिवसी दि. १३ रोजी सकाळी ९ ते दु. २ या कालावधित " हिवरे बाजार " गावास भेट दिली.गावात प्रवेश करताच दर्शन होते ते " हिवरे बाजार - ग्राम संसद " भवनचे. अखिल भारतात हे ऎकमेव गाव असावे की, जेथील ग्राम पंचायत ला ग्राम संसद असे संबोधण्यात आलेले आहे. ग्राम संसद भवन मध्ये प्रवेश करताच येथील कार्यकर्ते आणि श्री पोपटराव पवार यांचे सहाय्यक श्री मोहन चत्तर यांनी आमच्या टिमचे सहर्ष स्वागत केले. याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील आनखी एक टिम येथे आलेली होती.याप्रसंगी श्री मोहन चत्तर यांनी हिवरे बाजार गावाची पूर्व परिस्थिती, या पार्श्वभूमिवर या गावाचे सरपंच श्री पोपटराव पवार यांनी संपूर्ण गावचा विश्वास सम्पादन करून उभी केलेली ग्राम विकासाची चळवळ, यातून एक आदर्श गाव म्हणुन उदयास आलेले " हिवरे बाजार " याबाबतचा अतिशय रंजक आणि प्रेरणादायी इतिहास आमच्या समोर उभा केला.

यापसंगी श्री मोहण चत्तर यांनी हे ही सांगितले की, " आपण आता गावात जा, भेटेल त्या स्त्री - पुरुषाशी , मुलां मुलीशी संवाद करा ! वाटेल ते प्रश्न विचारा ! आपणास इथे जी माहिती मिळाली, त्याच्याशी विसंगत माहिती आणि विसंगत विचार तुम्हास कुठेच ऎकायला मिळणार नाही, तुमच्याशी संवाद करण्यास कोणी ही टाळा-टाळ करणार नाही ! केव्हडा प्रचंड विश्वास ! या विश्वासाचा पाया मजबूत करणे कामी या ठिकाणी श्री पोपटराव पवार आणि त्यांचे सहकारी यांना किती अथक परिश्रम घ्यावे लागले असतील ? असा विचार करता-करता आम्ही गावात फेर-फटाका मारण्यास निघालो.प्रशस्त आणि अतिशय सुंदर रस्ते, सुबक आणि सुशोभित घरे, प्रत्येक घरावर त्या घरात वास्तव्यास असलेल्या घर मालकीन आणि मालकाची नावे, रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे ! हे सर्व पाहून माझ्या स्वप्नापलीकडचे असे ही खेडे आपल्या देशात उभे राहू शकते ! असा विश्वास दुनावला ! हिवरे बाजार च्या ग्राम संसद भवनमध्ये श्री मोहन चत्तर यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द आणि परिस्थिती अगदी सत्य स्वरुपात आमच्या समोर येत होती.चालता- चालता एका घरासमोर आम्ही थांबलो, तिथे आपल्या कामात असलेल्या एका तरूण गॄहिणीला आम्ही प्रश्न विचारला " पोपटराव पवार कुठे रहातात ? " तिने अगदी उत्सहाने आम्हास सांगितले की , ’ ते शेतात रहातात . पुढे एक आजीमाय भेटल्या , आम्ही त्यांच्याशी हिवरे बाजार च्या विकासा विषयी संवाद सुरु केला.गावच्या विकास कामाविषयीची संपूर्ण जाण त्यांना होती, एवढेच नव्हे तर विकासाच्या सर्व मंत्र आणि तंत्रा विषयी , त्या बोलत असतांना त्यांच्या शब्दा-शब्दातुन पोपटराव पवार बरसत होते.आमचा योग चांगला होता , लगेच एक शालेय आणि कॉलेज तरुणांचा ग्रुप आम्हाला मिळाला, त्यांच्याकडून समजले की, गावातील एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित नाही आणि गावात गावात बालकामगार असण्याचा प्र्श्नच निर्माण होत नाही.

गावाचा फेर-फटाका संपताच पुन्हा लगेच श्री मोहण चत्तरची भेट झाली. आता उत्सुकता होती ती , त्यांनी केलेल्या " पाणी, माती आणि झाड -झाडोरांच्या संवर्धन कामाची माहिती जाणून घेण्याची ! आम्ही वहानाने हिवरे बाजारच्या उंच डोंगरावर पोंहचलो, इथून हिवरे बाजार गावचा संपूर्ण शिवार दिसत होता. शिवात सर्व ठिकाणी घेण्यात आलेली सी सी टी, दगडी बांध, मातीचे नाला बांध, पाझर तलाव आणि संरक्षित जंगल व चारा. या कार्यक्रमाचा "जीव" असलेले काम म्हणजे सी सी टी आणि चारा व वॄक्ष जोपासना याचे श्री मोहण चत्तर यांनी जवळून दर्शन घडविले, जागेवरच त्याचे तंत्र आणि त्यापाठीमागचे महत्व कथन केले, या उपचार पध्दीतीचे खरे आकलन आमच्या टिमला झाले.यानंतर श्री मोहण चत्तर यांचे मन:पूर्वक आभार माणून , पुन्हा भेटू म्हणून आम्ही हिवरे बाजार गावचा निरोप घेतला.

यानंतर आम्हास फा. बाकर यांनी उभे केलेल्या दरेवाडी या गावास भेट द्यायची होती, परंतु फा. बाकर दरेवाडी बाहेर गेल्याचे समजले आणि दरेवाडी गावास जावून परत अहमदनगरला येण्यास उशीर होणार, यामुळे जवळ्च असलेल्या आणि सोशल सेंटर ने उभे केलेल्या हिवरे-कोरद या गावास भेट दिली. येथे माहिती देण्यासाठी पाणलोट समिती पदाधिकारी पैकी कोणी भेटले नाही, यामुळे आम्ही एका नागरिकास सोबत घेवून थेट शिवारात गेलो. शिवारात पोंचल्या नंतर सोबच्या नागरिकाने व तेथे हजर असलेल्या शेतकरी बाबा ने शिवारात घेतलेल्या सी सी टी, पाझर तलाव आणि त्याखाली घेण्यात आलेल्या विहिरी, सिंमेंट नाला बंड याविषयी माहिती दिली. या ठिकाणी आमची आजची अभ्यास सहल संपवून आम्ही अहमदनगरला परतलो.

दुसऱ्या दिवसी दि. १४ रोजी आमच्या टिम ने राहूरी येथील प्रसिध्द म. फुले कॄषी विद्यापीठास भेट दिली.प्रारंभी कॄषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद सोळूंके यांनी विद्यापीठांतर्गत चालू असलेले कार्यक्रम आणि प्रयोग याविषयी माहिती दिली, याशिवाय आमच्या टिमच्या अपेक्षा लक्ष्यात घेवून फळबाग, रोपवाटीका, भाजीपाला लागवड, संद्रीय खते/ शेती विभाग इ. विभास भेटी देणे बाबत सुचवून सबंधित विभागांना भेटी देणे कामी साह्य व्हावे याकरिता एक गाईड पण आमच्या सोबत दिला. नियोजनाप्रमाणे आमच्या टिम ने सर्व सबंधित विभागांना भेटी देवून, त्या त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विभाग प्रमुखांकडून माहिती घेतली.

कॄषी विद्यापीठाची भेट उरकल्यानंतर आम्ही अहमदनगर येथील Action for food Production – AFPRO संस्थेस भेट दिली, या ठिकाणी युनिट मॅनेजर असलेले श्री साळुंके सर बाहेरगावी असतांना सुध्दा , त्यांनी त्यांचे सहकारी श्री शेटे यांना संदेश देवून AFPRO शी आमचा वार्तालाप होऊ शकेल याची व्यवस्था केली. AFPRO ऑफिस मध्ये पोंहचताच AFPRO ऑफिस मधील टिमने आमचे मन:पूर्वक स्वागत केले. याप्रसंगी प्रथम आम्ही आमच्या नेटवर्कचा उद्देश, आमची आतापर्यंतची वाटचाल , भविष्यात आम्हास AFPRO कडून अपेक्षित असलेले सहकार्य याबाबत माहिती दिली.आमच्या नेटवर्कच्या उद्देश आणि आतापर्यंतच्या वाटचालीचे स्वागत करुन AFPRO श्री शेटे सर यांनी AFPRO चा इतिहास आणि सध्या चालु असलेले कार्य याविषयी माहिती देवून , बालाघाट विकास समितीच्या भविष्यातील कामात AFPRO तांत्रिक साह्य निश्चित पुरवेल अशी खात्री दिली.

दुपारनंतर आमची टिम अभ्यास सहल संपवून अहमदपूरला परतली.परतीच्या वाटेवर असतांना आमच्या टिममध्ये सहली विषयी चालू असलेल्या चर्चेवरून ही अभ्यास सहल सार्थक ठरली असून प्रत्यक्ष भविष्यातील आमच्या कामात या एक्सपोजरचा नक्कीच फायदा होणार आहे, याची खात्री पटली.या अभ्यास सहलीत एकूण १३ सदस्यांनी स्वखर्चातून भाग घेतला होता , हे पण या सहलीचे खास नमुद करण्यासारखे वैशिष्ट्ये होय.

नियोजित कार्यक्रम:
पुढील ३ महिण्याच्या कालावधित बालाघाट समिती नेटवर्क मधील सदस्यांनी आणि समितीच्या वतीने खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे.
१. महराष्ट्र शासन अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून या वर्षी " अधिक झाडे लावा - झाडे जगवा " अभियान सुरु करण्यात आले आहे. या महत्वपूर्ण अभियानात बालाघाट विकास समितीने सक्रीय सहभाग व्हावे आणि समितीतील प्रत्येक सदस्य संस्थांने आपापल्या कार्यक्षेत्रातील किमान ५ गावातून याबाबत जनजागरण कार्यक्रम घ्यावेत असा निर्णय घेण्यात आला आहे.
२. बालाघाट समितीतील सर्व स्वंयसेवी संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची " पाणी, माती आणि ऊर्जा संवर्धन " या विषयाच्या अनुषंगाने क्षमता बांधणी व्हावी, या उद्देशाने NCRI च्या साह्याने या विषयावरी किमान ३ दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.